श्री.धावीर मंदिर सुशोभीकरणाचा निधी परत गेल्याने नागरिकांत संताप 

रोहा, दि. ३१ऑगस्ट:सचिन साळुंखे:- रायगड जिल्हा नियोजन समितीत मंजूर झालेल्या निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की रोहा नगरपालिकेवर ओढवली आहे. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ आल्याचा आरोप होत आहे. रोहा नगरीच्या प्रसिद्ध श्री.धावीर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राखून ठेवलेला पाच लाख रुपयांचा निधी परत गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

शासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला जातो. वेळेत नियोजन करून निधी खर्च करणे अपेक्षित असताना रोहा नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सन २०२२-२३ या वर्षातील धावीर मंदिर सुशोभीकरणाचा पाच लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेल्याने खळबळ उडाली आहे. नागरीक संताप व्यक्त करत आहेत.सदर निधी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मंजूर झाला होता. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी 'धावीर मंदिर सुशोभीकरण करणे' कामाला प्रशासकीय मान्यता घेऊन निधीची मागणी करणे अपेक्षित होते, परंतु नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कुठलेही नियोजन न केल्याने सदर काम रद्द करण्यात आले. मंजुरीच्या आदेश पत्रात तसा स्पष्टपणे उल्लेख केलेला होता. रोहा नगरपालिका प्रशासनाच्या ही प्रशासकीय बाब लक्षातच आली नाही.


- :रस्त्यांच्या कामांचीही दुरवस्था :-


बांधकाम विभाग सुस्त असल्याने रोहा नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. सांडपाण्याचा निचरा होणारी गटारे नाहीत. भुयारी गटार योजना भूमिगत झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी घेणेदेणे नसलेले बांधकाम विभाग विकासकांना परवानग्या देण्यात मात्र व्यस्त आहे. परवानग्या देताना कुठलेही निकष तपासले जात नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मागील तीन महिन्यांपासून नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिकेचे प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आहे अशी जोरदार चर्चा शहरात सूरु आहे.

Comments

Popular posts from this blog